दसरा म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, क्षात्र तेजाचा आणि पाटी पूजनाचाही सण. “दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा,’ असे म्हणण्यातूनच दसरा आणि त्याचे माहात्म्य व्यक्त होते. पण हा एवढाच दसरा आहे का?

एके काळी दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघनाला जाण्याची पद्धत होती. पावसाळ्याचे दिवस आपापल्या शेताची, घराची काळजी घेतल्यानंतर मराठी वीर या दिवशी आपल्या तलवारी, भाले बाहेर काढायचे. पाती उजळली जायची, त्यांची पूजा व्हायची आणि स्वाऱ्या “मुलूख मारायला’ बाहेर पडायच्या.

काळानुसार त्यात बदल झाला. दसऱ्याच्या दिवशी स्वाऱ्यांना जाणे थांबले. सोने लुटणे म्हणजे संध्याकाळी देवाला जाऊन येताना आपट्याची पाने आणणे, एवढ्यापुरते मर्यादित राहिले. सीमोल्लंघन म्हणजे गाड्या काढून जवळच्या एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन येणे, एवढेच बाकी राहिले.

यात काय चुकीचे आहे, असा प्रश्‍न पडणे साहजिकच आहे. आता आम्ही काय लढायला जायचे का, असा प्रश्‍न विचारणेही स्वाभाविक आहे. परंतु यात एकच सतत जाणवत राहते की आपण “सीमोल्लंघन’ या संकल्पनेचा अर्थ फारच संकुचित घेतला आहे. सीमोल्लंघन हे एखाद्या क्षेत्रात होऊ शकते, आपल्या जीवनशैलीत होऊ शकते, आपल्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक बाबींमध्येही होऊ शकते! असे सीमोल्लंघन करणाऱ्यांची उदाहरणेही आपल्या आसपास आहेत. याबाबतचे अगदी आताचे उदाहरण द्यायचे तर “गांधीगिरी’ हे “गांधीवादा’ने केलेले सीमोल्लंघनच आहे!

योग्य कारणासाठी किंवा नव्या जमान्यात न सामावणाऱ्या चौकटी मोडणे, असा सीमोल्लंघनाचा नवा अर्थ घेता येईल. केवळ कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी घरदार सोडणारे बाबा आमटे, आदिवासींची सेवा करण्यासाठी बाबांच्या पावलावर पाऊल ठेवणारी त्यांची मुले, सुना, नातवंडे आणि नातसुना या साऱ्यांनी सीमोल्लंघनच केले आहे. एखादी फ्लॉरेन्स नाईटिंगेल जननिंदेची पर्वा न करता रुग्णांच्या सेवेचे व्रत अंगीकारते, तर एखादी मेधा पाटकर धरणग्रस्तांच्या मागण्यांसाठी रान पेटवते, एखादा राजेंद्रसिंह राजस्थान हिरवागार व्हावा म्हणून जिवाचा आटापिटा करत असतो. हे सारे तत्कालीन चौकटी मोडणारे, समाजाने किंवा कुटुंबाने घातलेल्या सीमा ओलांडणारेच आहेत. एखादे रघुनाथ माशेलकर, एखादे नरेंद्र जाधव, एखादे लक्ष्मी मित्तल किंवा एखादे धीरूभाई अंबानी आपल्या आर्थिक सीमा धैर्याने ओलांडून शैक्षणिक किंवा आर्थिक क्षेत्रात गगनभरारी घेतात, हे सीमोल्लंघनच नाही का?

सीमोल्लंघनाचा हा अर्थ आता आपण समजावून घेण्याची गरज आहे. अगदी जवळचे उदाहरण द्यायचे तर वाहतुकीचे नियम पाळणे, प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करणे किंवा तसा प्रयत्न करणाऱ्यांना सहकार्य करणे, हेदेखील आपल्या दृष्टीने सीमोल्लंघन होऊ शकते. सीमोल्लंघनाचा हा नवा अर्थ खूप महत्त्वाचा आहे. अनेकांनी तो सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता गरज फक्त आचरणात आणण्याची आहे!

 

Copy-Pasted from http://www.esakal.com/aadishakti/vijayadashami.html

Advertisements